जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगले असून मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आमच्या महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नसून महायुती भक्कम आहे. आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी 50 तर शिवसेना शिंदे गट 25 जागांवर ही निवडणूक लढणार असल्याचं आमदार किशोर पाटलांनी सांगितले.

महापालिकेची आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये तत्त्वतः एकमत झाले असले, तरी प्रत्यक्षात जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असून जागांचे नेमके गणित न सुटल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

अशातच महायुतीत जागा वाटपावरून होत असलेल्या चर्चेवर आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया आहे. ते म्हणाले, काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत ५० जागा भाजपला आणि २५ जागा शिवसेनेला देण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवर किंवा प्रमुख घटक पक्षांमध्ये काय चर्चा झाली, याची मला सविस्तर माहिती नाही. परंतु, आमच्या वाट्याला येणाऱ्या २५ जागांसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली असून, ठरल्याप्रमाणे आम्ही त्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.”

परंतु महायुतीमधील घटना पक्ष तिसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत लढणार का? लढण्यास किती जागा देण्यात येणार? याबाबत संभ्रम कायम आहे. आमदार किशोर पाटील यांनी मनपातील ७५ जागांपैकी २५ जागा शिवसेना लढणार असल्याचं सांगितलं असून उर्वरित जागा भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपल्या कोट्यातून देणार असल्याची मोठी माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली









