जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉनचे भारतात दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आल्यानंतर महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनने धडक दिली आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे. या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. रुग्णाने दुबईमार्गे दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला आहे.
कल्याण-डोंबिवलीत आढळून आलेल्या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होता.
कल्याण डोंबिवलीतील या रूग्णाला दि.२४ नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय या रूग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या रुग्णामुळे राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे आवश्यक आहे.