⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

Raver : केळीवर ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव ; शेतकऱ्याने 4000 केळीची खोडे फेकली उपटून

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । केळीवरील सध्या कुकुंबर मोजाक व्हायरस (सी.एम.व्ही.) रोगाने केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून लाखो रुपये खर्चून लागवड केलेल्या केळी बागा उपटून फेकाव्या लागत आहेत. दरम्यान, रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकऱ्याने 4000 केळी लागवड असलेला संपूर्ण प्लॉट उपटून फेकले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

यावल – रावेर केळी उत्पादक परिसरातील शेतकरी बांधव सध्या कुकुंबर मोजाक व्हायरस (सी.एम.व्ही.) या केळीवरील रोगाने त्रस्त झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने केळीचे प्लॉट अक्षरशः फेकून द्यावे लागत आहे. यातच कुसुंबा येथील प्रवीण फकिरा महाजन या शेतकऱ्याने त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेल्या 4000 केळी प्लॉट उपटून फेकले. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

गेल्या मागील काही वर्षांपासून शेतकरी बांधव अतिवृष्टी,चक्रीवादळ,अश्या अनेक संकटाचा सामना करत आहेत, त्यात या व्हायरस मुळे शेतकरी खूप संकटात सापडला आहे. दरम्यान, रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी लोहारा परिसरात पाहणी करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनाने करण्यात यावे असे आदेश दिलेत.

दरम्यान, विषाणूजन्य रोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकावरील विषांणूजन्य रोगांचे नियंत्रण करुन नुकसान टाळणे गरजेचे आहे. केळी पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. बदलते वातावरण आणि ढगाळ हवामान यामुळे रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. गेल्या 2-3 वर्षांपासून केळीवर ककुंबर मोझॅक विषाणू (सी.एम.व्ही.) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे.