⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

इंडोनेशिया उद्यापासून घालणार पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी, भारतावर होणार मोठा परिणाम

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक इंडोनेशिया उद्यापासून म्हणजेच 28 एप्रिलपासून पाम तेल आणि त्याच्याशी संबंधित कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालणार आहे. इंडोनेशियाने देशांतर्गत बाजारात पाम तेलाच्या किमती वाढल्यामुळे हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, या बंदीचा भारताला सर्वाधिक फटका बसणार आहे, कारण भारत इंडोनेशियातूनच बहुतेक पामतेल आयात करतो.

दरम्यान, इंडोनेशियाने केवळ परिष्कृत, ब्लीच्ड डिओडोराइज्ड पामोलिन (RBD) वरील निर्यातवर बंदी लादली आहे. इंडोनेशिया क्रूड पाम तेल (CPO) आणि इतर डेरिव्हेटिव्ह उत्पादनांची निर्यात करणे सुरू ठेवेल. इंडोनेशियन पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी आल्याच्या वृत्तानंतर भारतातील खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर आगामी काळात त्यात आणखी 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी भीती सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे.

भारत आणि चीन हे जगातील दोन देश आहेत जे इंडोनेशियामधून सर्वाधिक पामतेल आयात करतात. भारत दरवर्षी इंडोनेशिया आणि मलेशियामधून 8 दशलक्ष टन पाम तेल आयात करतो. आता 28 एप्रिलपासून बंदी लागू झाल्यानंतर आयात कमी होईल. यापैकी 70 टक्के इंडोनेशिया आणि 30 टक्के मलेशियामधून येतात. सोप्या भाषेत समजले तर भारत इंडोनेशियावर अधिक अवलंबून आहे, अशा परिस्थितीत देशात आधीच अस्तित्वात असलेल्या तेलाच्या किमती वाढू शकतात.

दरम्यान, सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल तेलाच्या किमती भारतात आधीच जास्त आहेत. बंदीनंतर त्यांच्या किमती आणखी वाढतील. बंदीमुळे सौंदर्यप्रसाधने, साबण आणि पाम तेलातून तयार होणारे शाम्पू यांसारख्या दैनंदिन वस्तू महाग होऊ शकतात.