⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या देशवासियांसाठी मोठी बातमी ; कधी दाखल होणार केरळात?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । देशभरात उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. मान्सूनसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. एरवी केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर मुंबईत १० ते १८ जूनच्या दरम्यान केव्हाही दाखल होऊ शकताे.

मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागताच सर्वसामान्यांसह शेतकरी राजा सुखावून जातो. आभाळाकडे डोळे लावून बसतो. मात्र, यंदा हाच मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवेळी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा हाच मान्सून चार दिवस उशिराने दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मान्सून ६ ते १० जून दरम्यान महाराष्ट्राच्या वेशीवर हजेरी लावेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला.मुंबईतल्या आगमनानंतरच उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येईल. म्हणजेच आजपासून १ महिन्यानंतरच उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून या दोन स्वतंत्र गोष्टी असून त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत. भारतीय हवामान विभागाकडून ३१ मे दरम्यान मान्सूनसंबंधी सुधारित अंदाज येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मान्सूनची टक्केवारी व वितरणाचा अंदाज येईल.