⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

यंदाचा मान्सून देशासह महाराष्ट्रात कसा असेल? स्कायमेटकडून दिलासा देणारा अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा पारा ४० वर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. यातच अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावं लागत आहे. यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय.

स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेच्या अहवालानुसार, यंदा भारतात जून आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. देशात ८६८.६ मिलीमीटर पाऊस पडणार अशून या पावसाची टक्केवारी १०२ टक्के असणार आहे. त्यात ५ टक्के वाढ किंवा घट होऊ शकते.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे. सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो.

महाराष्ट्रात कसा असेल पावसाळा
‘मान्सून फोरकास्ट 2024’ या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे.