जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने तुपाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण गाईचे तूप प्रतिलिटर ३० रुपये तर म्हशीचे तूप ५० रुपयांनी महागणार असल्याचे समोर आलेय. संघाने महिनाभरात दरात दुसऱ्यांदा ही वाढ केली आहे. नवे दर मंगळवारपासून (१७ मे) लागू हाेणार आहेत.
आधीच देशभरात इतर वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. दैनंदिन वास्तूपैकी दुधाचे दर आधीच भरमसाठ वाढले आहे. सध्या दुधाचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. त्यांनतर आता तुपाच्या दरात वाढ होण्याच्या शक्यता आहे. जिल्हा दूध संघाने वर्षभरापासून तुपाच्या दरात वाढ केली नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यात तुपाचे दर तब्बल ९० ते १०० रुपयांनी महागले आहे.
महिनाभरापूर्वी गायीच्या तुपाचे दर हे प्रतिलिटर ६० रुपये वाढवल्याने ५७० रुपये झाले हाेते. आता त्यात पुन्हा ३० रुपयांची वाढ करून ६०० रुपये लिटर झाले आहेत. म्हशीचे तूप महिनाभरापूर्वी ५३० रुपये प्रतिलिटर हाेते. त्यात ५० रुपयांची वाढ करून ५८० रुपये झाले हाेते. त्यात आता पुन्हा ५० रुपयांची वाढ केल्याने प्रतिलिटरचे दर ६०० रुपये असणार आहेत.
उत्पादन खर्च वाढल्याने घेतला दरवाढीचा निर्णय
दरम्यान, तुपाची दर महिन्याला ६० टनाची मागणी असते. दीड वर्षापासून दरवाढ केलेली नव्हती. त्यामुळे मागील महिन्यात दर वाढवले. ते स्पर्धक ब्रॅण्डेड उत्पादकांच्या दरापेक्षा कमीच हाेते. दूध खरेदी दरात वाढ केल्याने उत्पादन खर्च वाढल्याने पुन्हा दरवाढ करावी लागली असल्याचे जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनाेज लिमये यांनी सांगितले आहे.