सोयाबीन दरात अचानक वाढ, आता प्रति क्विंटलला मिळतोय इतका भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२४ । सोयाबीनच्या दरात अचानक आठवडाभरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून ४२०० रुपयांपर्यंत खाली असलेल्या सोयाबीन दरात गेल्या आठवडाभरातच ३०० रुपयापर्यंतची वाढ झाली. यामुळे आता सोयाबीनचा भाव आता ४५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यास अद्याप १५ ते २० दिवसांचा आहे. अशात बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे. बाजार समित्यांत सोयाबीनची आवक घटत असल्याने दरात वाढ होत असली तरी हमीभावापेक्षा कमीच दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शासनाने २०२३-२४ या वर्षासाठी ४६०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला होता. मात्र, सध्यस्थितीत शेतकऱ्यांना हमीभावदेखील मिळत नाही. शासनाने २०२४-२५ या वर्षासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे.
खाद्यतेलाच्या मागणीत वाढीचा परिणाम
आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलाच्या मागणीत वाढ होत आहे. १ त्यामुळेच सोयाबीनच्या तेलाचे दरही मागील काही दिवसांपासून काहीसे वाढत आहेत. याचा परिणाम बाजारावर होत असून, मागणीच्या तुलनेत सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने सोयाबीनच्या दरात आता वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापुढेही सोयाबीनच्या दरात सुधार होण्याची शक्यता व्यापाऱ्याऱ्यांनी वर्तविली आहे
मूग, उडीद खरेदीची प्रतीक्षा..
बाजारात अद्याप नवीन सोयाबीनची आवक सुरु झाली नसली तरी मूग व उडीदची आता शेतकऱ्यांकडून काढणी सुरु झाली आहे. मात्र, अद्याप बाजार समितीमध्ये मूग, उडीदची खरेदी केली जात नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून दरवर्षी हंगाम संपल्यानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात येत असतात. त्यामुळे या खरेदी केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना न होता, व्यापाऱ्यांनाच अधिक होतो. त्यामुळे शासनाने यंदा मूग व उडीदची शासकीय खरेदी लवकर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे