⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | महाराष्ट्रातील होमगार्ड्सना खुशखबर! मानधनासह विविध भत्त्यांची रक्कम दुपट्टीने वाढलं, शासन आदेश जारी

महाराष्ट्रातील होमगार्ड्सना खुशखबर! मानधनासह विविध भत्त्यांची रक्कम दुपट्टीने वाढलं, शासन आदेश जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२४ । राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना सरकारने दसऱ्याचं मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला असून यासंदर्भातील घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

ही भत्तेवाढ दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन खूपच कमी असल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात काहींनी आवाज देखील उठवला होता. हीच बाब लक्षात घेता काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. आज या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सदरहू सुधारित भत्ते लागू करण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रु.५५२.७१२० कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी रुपये ७९५.७१२० कोटी रकमेची तरतूद करण्यास मान्यता देखील दिली गेली आहे. त्यानुसार, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे.

राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्ड्सना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया राबवली होती. ती सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी होमगार्ड्सना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.