जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमधून शिथिलता देताच जळगाव आगाराने बसफेऱ्यात वाढ केली आहे. काल सकाळी जळगाव आगारातून नाशिक, औरंगाबाद, धुळे यासह जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, रावेर आदि ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या.
कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. मात्र, १ जूनपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता उठविण्यात आल्यामुळे महामंडळातर्फे मंगळवारपासून पुन्हा बस सेवा सुरू केली आहे. एसटीने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी १४ फेऱ्यांपर्यंत वाढ केली आहे. जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग नष्ट झाल्यानंतर तसेच जिल्ह्यातून संपूर्णत: लॉकडाऊन निघाल्यानंतरच खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात येतील असे आगार प्रमुख पाटील यांनी सांगितले.
अशा आहेत एसटीच्या फेऱ्या
नाशिक सकाळी १० वाजता एक फेरी, औरंगाबाद सकाळी ८ वाजता एक फेरी, धुळ्यासाठी १० फेऱ्यांसह एक मुक्कामाला, तसेच पुरेसे प्रवासी मिळाल्यास चाळीसगाव-पाचोरा, मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा, धरणगावमार्गे अमळनेर, जामनेर येथेही बस धावणार. मात्र, मार्गावर पुरेसे प्रवासी नसल्यास ह्या बसफेऱ्या रद्द करण्यात येतील.