जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत ४८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी जळगावला लागून आलेल्या कुसुंबा येथे घडलीय. संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
कुसुंबा येथे संगीता पाटील या आपल्या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह वास्तव्याला होत्या. गेल्या आठ दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी असल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीताबाई पाटील ह्या आज शुक्रवार ६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्यासाठी निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधा वेगाने येणार्या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १९ सीवाय ७०९१) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ही घटना घडल्यानंतरच त्याच रुग्णवाहिकेतून संगीताबाई पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.