⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

खडसेंच्या उपस्थितीत राम मंदिराच्या सभागृहाचे उदघाटन, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आमदार असताना 2018-2019 मध्ये त्यांच्या प्रयत्नातून मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे राम मंदिर सभागृहासाठी निधी मंजूर झाला होता. त्याचे बांधकाम नुकतेच पूर्णत्वास आल्यानंतर रामनवमीचे औचित्य साधून दि. १० रविवारी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची नावे नसल्याने त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. केवळ भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले मोजकेच पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

लोकार्पण शिलालेखावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाध्यक्ष, मावळते सभापती व तालुक्यातील पदाधिकार्‍यांची नावे असायला हवी होती, असे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ म्हणाले तर याच नाराजीच्या भावनेतून एक दिवस आधी बैठक घेतल्यानंतर पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमास न जाण्याचे ठरवल्याने मोजक्याच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. राष्ट्रवादीतही जुना व नवा गट असा वाद सुरू झाल्याचे येथे पहावयास मिळाले आहे.

कार्यक्रमास भाजपाचे होमराज महाजन, प्रशांत महाजन, कैलास दूट्टे, मिलिंद महाजन, मोहन सुधाकर महाजन, निवृत्ती पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.

प्रोटॉकॉलप्रमाणे कार्यक्रम : खडसे

नियमाप्रमाणे कुणाचे नाव कोणशीलेवर असावे याबाबत शासनाचा प्रोटोकॉल असतो व तो पाळण्यात आला आहे. इतरांचीही नावे कोनशीलेवर असावीत, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे कारण हा पक्षाचा कार्यक्रम नाही तर शासनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सरकारी काम असल्याने शासकीय प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आहे. नेमकी माहिती जाणून घेवू व नाराजी पदाधिकार्‍यांची समजूत काढण्यात येईल, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.