जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देशातील नवउद्योजक, तरुण आणि महिलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘खान्देश इन्क्युबेशन टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रेनरशिप फोरम’ (KITE) या पहिल्या कम्युनिटी स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटरचा शुभारंभ २८ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडला.

के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित या सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’चे (मुंबई) चेअरमन अशोक दुगाडे उपस्थित होते. त्यांनी मराठी तरुणांना नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचा उद्योग उभारण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी जळगाव किंवा धुळ्यापुरते मर्यादित न राहता राज्य आणि देशाबाहेर आपले पाय रोवावेत, असे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील उद्योजकतेवर भर दिला. नवीन उद्योग हे शाश्वत, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी असावेत, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात सागर पाटील यांनी स्पष्ट केले की, ‘काईट’ केवळ स्टार्टअप्ससाठीच नाही, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) तांत्रिक आणि व्यावसायिक साहाय्य करण्यासाठी कटीबद्ध आहे. यावेळी डॉ. शांताराम बडगुजर यांनी ‘काईट’ हा समाजासाठी आणि समाजाने चालवलेला उपक्रम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन डॉ. भूषण चौधरी, डॉ. विकास गीते, डॉ. युवराज परदेशी, अजिंक्य तोतला यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी ‘इलेक्ट्रो सॉफ्ट’ आणि ‘काईट’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. इलेक्ट्रो सॉफ्ट च्या वतीने निलेश वाघ व राजेश ठाकरे यांनी स्वाक्षरी केली.
‘काईट’च्या संचालक मंडळात डॉ. शांताराम बडगुजर, डॉ. युवराज परदेशी, सागर पाटील व ऋतगंधा देशमुख यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय धनगर यांनी केले, तर डॉ. युवराज परदेशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार भांबरे, रजत भोळे, सायली देशमुख, विजय शेले, गंधाली देशमुख, के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, आयएमआर कॉलेज, अपेक्स स्टार्ट अप ग्रुप, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट व काईट परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.







