जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी धावून जाणारी उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना लोकसंघर्ष मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज, मुलींचे वसतिगृह) येथे बुधवार दि. १७ मार्च २०२१ पासून जळगावकरांच्या सेवेत सुरु होत आहे.
कोरोना महामारीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रकोप बघता लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रयत्न व पुढाकारातून हे कोव्हीड सेंटर रुग्णांना निःशुल्क सेवा उपलब्ध करून देणार आहे. बुधवारी दु. २.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन होत असून यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे,महानगर पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी शासकीय वैद्यकीय, जिल्हा शल्यचिकि्सक श्री डॉक्टर चव्हाण, प्रतिभाताई शिंदे व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटरमध्ये १२५ बेडची व्यवस्था असून रुग्णाच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, चहा, भोजन तसेच आवश्यकत्यानुसार रुग्णवाहिका इत्यादी सेवा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी कळविली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा लोकसंघर्ष मोर्चाने संयुक्त विद्यमाने कोव्हीड केअर सेंटर सुरु करून गरजू रुग्णांना दिलासा दिला होता. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्हा व शहरामध्ये रुग्ण आढळून येत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या भावनेतून लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी पुन्हा लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.
जगण्याचा व आरोग्य सेवा प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांनाच असला तरी सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू लोकांना पैशांअभावी सहजतेने बेड उपलब्ध होत नाहीत. अशा सर्वांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर हक्काचे व विश्वासाचे ठिकाण म्हणून उपलब्ध होत आहे. आजारपणाच्या काळात घरापासून लांब राहताना रुग्णाला आरोग्यविषयक कोणतीही कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी लोकसंघर्ष व्यवस्थापनाने घेतली आहे. रुग्णांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोक संघर्ष मोर्चा तर्फे प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, भरत कर्डिले, प्रमोद पाटील ,दामोदर भारंबे, कैलास मोरे, उर्मिला पाटील यांनी केले आहे.