जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स नियंत्रणासाठी कार्य केले जाते. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात गेल्या सहा महिन्यात ८२ हजार ४०२ नागरिकांनी एचआयव्ही चाचणी केली असता १७३ बाधित आढळून आले. तपासणीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ०.०२ टक्के असून हि जिल्ह्यासाठी सकारात्मक बाब आहे. तसेच इ.आय.डी.केंद्रात गेल्या ११ वर्षात करण्यात आलेल्या १८ वर्षाखालील बालकांच्या तपासणीत केवळ १० बालके एचआयव्ही बाधित आढळून आली आहेत. आज जागतिक एचआयव्ही एड्स जनजागृती दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण २३ एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे (दिशा) आहेत. एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या काळात जिल्हाभरात ८२ हजार ४०२ नागरिकांनी तपासणी केली असता त्यापैकी १७३ नागरिक बाधित आढळून आले. तसेच याच काळात ७३ हजार ६४३ गरोदर मातांची तपासणी केली असता ९ गरोदर माता एचआयव्ही बाधित आढळून आल्या आहेत. तपासणीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.
बालकांची दीड वर्षात तीन वेळा होते तपासणी
जिल्ह्यातील १८ महिन्याखालील बालकांची एचआयव्ही चाचणी सर्व उपजिल्हा, ग्रामीण, कुटीर रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात करण्यात येते. एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान जिल्ह्यात ६६६ बालकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असता त्यात १० बालके बाधित आढळून आली आहेत. एचआयव्ही बाधित मातेच्या बालकांची ई.आय.डी.केंद्रात तपासणी केली जाते. बालकांची तपासणी डीएनए आणि पीसीआर पद्धतीने केली जात असून रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत असतात. बालकांची तपासणी ३ टप्प्यात केली जाते, त्यात नवजात अर्भक ते २ महिने वयोगट, ६ महिने ते १२ महिने वयोगट आणि १८ महिने वयोगट अशी तीन वेळा चाचणी होते. तिन्ही वेळेस बालक बाधित आढळून न आल्यास त्याला एचआयव्हीचा धोका कमी असतो.
एचआयव्ही आणि क्षयरोग विभाग मिळून करतात कार्य
एचआयव्ही बाधितांची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्याने त्यांना इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः त्यांना क्षयरोग लवकर होत असतो. जिल्ह्यात एचआयव्ही आणि क्षयरोग विभाग समन्वय राखत काम करतात. गेल्या सहा महिन्यात ३ हजार ६९० एचआयव्ही बाधितांपैकी ४२७ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळून आले तर ७०३ पैकी ३ क्षयरोग बाधितांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले.
जिल्ह्यात २ मुख्य आशा केंद्रावर मिळतात औषधी
जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांना संधीसाधू आजारांची लागण होऊ नये यासाठी त्यांनी रोगप्रतिकारक औषधी देण्यात येत असते. जिल्ह्यात जळगाव आणि अमळनेर येथे एआरटी सेंटर (आशा केंद्र) आहेत. जून २०१८ पासून एआरटी केंद्रावर व्हायरल लोड (शरीरातील विषाणूंचे प्रमाण तपासणे) देखील मोफत केले जाते. या तपासणीनंतर औषधोपचाराची दिशा देखील ठरत असते. जिल्ह्यातील १० एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात लिंक एआरटी केंद्राद्वारे २२०० रुग्णांना तालुकास्तरावर औषधी उपलब्ध करून दिली जात आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीचा उतरता आलेख
जिल्ह्यातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (दिशा केंद्र) तर्फे देण्यात आलेली आकडेवारी उतरत्या क्रमाने असली तरी जिल्ह्यासाठी सकारात्मक आहे. २००७-०८ मध्ये २५ हजार ५६६ नागरिकांनी तपासणी केली होती त्यापैकी १४२३ व्यक्ती एचआयव्ही बाधित आढळून आले होते. २०१४-१५ मध्ये १ लाख ७४ हजार ६८१ व्यक्तींनी तपासणी केली असता त्यापैकी १०२४ व्यक्ती बाधित आढळून आल्या. २०२०-२१ मध्ये २ लाख ४९ हजार ५३७ व्यक्तींनी तपासणी केली असता त्यात केवळ २६५ व्यक्ती बाधित आढळून आल्या. जिल्ह्यातील उतरती आकडेवारी जिल्ह्यात जनजागृतीचे कार्य योग्य पद्धतीने सुरु असल्याची जाणीव करून देते.
जिल्ह्यात ८० कर्मचारी बजावतात सेवा
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण २३ एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे असून दोन एआरटी केंद्रे आहेत. जिल्ह्यात ८० व्यक्ती सेवा देतात. त्यापैकी दिशा केंद्रात ५२, एआरटी केंद्रात २१, डापू केंद्रात ४ कर्मचारी आणि समन्वयक कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी हे या समितीचे प्रमुख असतात.