⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

आई वडील करतात विहीर खोदण्याचे काम; ‘एमपीएससी’ तुन एकाच वेळी मिळवली २ पदे

जळगाव लाईव्ह न्यूज। २४ जुलै २०२३। कष्ट, मेहनत परंतु ह्याचसोबत असलेली जिद्द आणि चिकाटीची साथ व्यक्तीच्या जीवनाला उत्तुंग भरारी प्राप्त करून देत असते. उंच भरारी घेण्यासाठी कोणतीही परिस्थिती अडवू शकत नाही. फक्त, तयारी असली पाहिजे प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची, आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची आणि संयम असण्याची! ही त्रिसूत्री होती कविताकडे.

बंजारा समाजातील कविता राठोड ही युवती एमपीएससी परीक्षेत एकाच वेळी दोन पदे मिळवत राज्यात पहिली आणि चौथी आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आसंगी तुर्क हे तिचे गाव. कविताचे आई वडील विहीर खोदण्याचे काम करतात. त्यांच्या कष्टाची आणि कुटुंबाकडून मिळणाऱ्या साथीची जाणीव कविताला होती. आसंगी तुर्क सारख्या दुष्काळी भागातील कविता रहिवासी आहे.

कविता ज्याठिकाणी राहते, तिथे शासनाकडून पाणी आणि वीज या मूलभूत सुविधाही अजून पोचलेल्या नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेले गाव आसंगी तुर्क. कविता आजही शिक्षण आणि प्रागतिक क्षेत्रापासून कोसो मैल दूर असणाऱ्या बंजारा समाजातील. आई रमाबाई (५५) अवघड अशा यारीच्या यंत्रावर काम करतात तर वडील भिमु राठोड (५८) खोलवर विहीर खणतात. भाऊही त्यांच्यासोबत कामावर जातो. या कुटुंबाने कष्टाची कामे करत कविता हिला शिकवले.

कविताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाले. ८ वी ते १० वी शाळा कधी बौद्ध विहाराच्या कोपऱ्यात तर काहीवेळा पडक्या घरात भरणाऱ्या शाळेत झाले. संत सद्गुरू भीमदास महाराज करांडे विद्यामंदिर असे त्या शाळेचे नाव आहे. नंतर कविता ११-१२वी साठी १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या संख येथील राजारामबापू पाटील शाळेत सायकलवरून गेली. विज्ञान विषय असणारी एकमेव मुलगी हि कविता होती.

बारावीत सकाळी क्लासेस असायचे त्यामुळे पहाटे ४ वाजता उठून सायकलवरून तेरा किलोमीटर प्रवास करून जावे लागायचे. बारावीत ७० टक्के होते. विज्ञान शाखेतच शिकण्याचीच इच्छा होती, पण वेळेत प्रक्रिया न समजल्याने प्रवेश घेता आला नाही. जर परिस्थितीमुळे थांबली असती तर वर्ष वाया गेले असते. तर या भीतीने नाईलाजास्तव बीएला प्रवेश घेतला. विटा येथे बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश मिळाला, पण कॉलेजला पलूसला आर्टस् कॉमर्स कॉलेजला जावे लागले. तिथे शिकत असताना इस्लामपूरच्या अस्लम शिकलगार यांच्या महाराष्ट्र अकॅडेमीची माहिती मिळाली.

दरम्यानच्या काळात भाऊ बंडू आणि वडील यांनी मिळेल तिथून पैसे जमा केले आणि शिक्षणाचा खर्च भागवला. वडिलांनी तर सावकारी व्याजाने कर्ज काढून कविताच्या क्लासची फी भरली. बंडू यांना एसटीत वाहक म्हणून नोकरीही मिळाली. पण तिथेही कर्ज काढल्याने हातात काटछाट करून मोजकाच पगार मितीला असे. त्यात त्यांना एकूण पाच अपत्य. त्यात तीन भाऊ, दोघी बहिणी. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायला कष्टाशिवाय पर्यायच नाही.

कविता हिने महाराष्ट्र अकॅडेमीत बारा ते चौदा तास अभ्यास केला. अस्लम शिकलगार यांनी प्रेरणा दिली. सतत आरोग्याच्या तक्रारी होत्या असतानाही घरातील सदस्यांनी तिला वेळोवेळी सांभाळून घेतले. कोरोनाकाळात सगळे विद्यार्थी आपापल्या गावी, घरी गेलेले पण कविताला जाता आले नाही. आईवडील विहीर खोदण्याच्या कामासाठी कोकणात होते. जिल्हाबंदीमुळे आई वडील कोकणात तर कविता गावी होती. त्या भीतीदायक काळात खूप खच्चीकरण झाले. पण तरीही कविताने हार मानली नाही.

जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देऊन आता माघार घ्यायची नाही असे कविताने ठरवले. शासकीय नोकरी मिळवायचीच अशी खुनगाठच कविताने मनाशी बांधली होती. तिने अगदी जीव ओतून अभ्यास केला. म्हणतात ना कष्टाला फळ असतंच, त्याचप्रमाणे परिस्थितीला घाबरून न जाता जिद्दीने केलेल्या अभ्यासाचा फायदा कविताला परीक्षेत झाला. एकाचवेळी त्यांना दोन पदे मिळाली. कधी काळी कविता यांच्या या प्रवासकडे संशयाने पाहणारे, ती कधी यशस्वी होणार याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे.

कविता यांच्या निवडीनंतर बंजारा समाजातील लोक, ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गावातून मिरवणूक काढून त्यांनी आनंद साजरा केला. “यापुढच्या काळात समाजातील मागासलेपण आणि अज्ञान दूर करण्यासाठी आग्रही राहीन”, अशी भूमिका देखील तिने व्यक्त केली.

“लॉकडाऊन काळात कोरोनाची साथ आता लवकर जाणार नाही या चर्चेने नैराश्य आलेले. पण आईवडील घेत असलेले कष्ट पाहून अंतःप्रेरणा जागी व्हायची. इतक्या वयातही पहाटे चार वाजता उठून आईवडील इतकी कष्टाची कामे करतात, तर आपण अभ्यास का नाही करू शकत? असे नेहमी वाटायचे. आणि इतक्या कष्टातून बहीण-भाऊही आपणाला सपोर्ट करतायत हे पाहून प्रेरणा मिळायची. यातूनच यश मिळवू शकले.” कविता राठोड, आसंगी तुर्क (ता. जत)

“ग्रामीण विद्यार्थी प्रशासनाचा कणा बनावा हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र अकॅडमी कार्यरत आहे. आजवर अनेक विद्यार्थी या प्रेरणेतून घडले आहेत. कविता राठोड सारख्या विद्यार्थ्यांनी ते ब्रीद सार्थ ठरवले आहे. अशा व्यक्ती उभ्या राहिल्या की आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.” अस्लम सुतार-शिकलगार संस्थापक सचिव, महाराष्ट्र अकॅडमी, इस्लामपूर