दरवाजा तोडताना सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला, ३८ लाखाचे सोने वाचले
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना समोर येत असून यामुळे चोरट्यांना खाकीचा धाकच राहिलेला नसल्याचं दिसतेय. अशातच जळगाव शहरातील सराफ बाजारातील पद्मावती गोल्ड या दागिने घडवणाऱ्या या दुकानाचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र, दरवाजाला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. सेन्सर डोअर सिस्टीममुळे या दुकानातील सुमारे ३८ लाखाचे सोने सुरक्षित राहिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत असे की, मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड सोने-चांदीचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेले लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाला लावलेले सायरन वाजल्याने मोठ्या आवाजामुळे घरात झोपलेले इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा आवाज होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.
दुकान फोडण्यापूर्वी चोरट्यांनी आर. वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली होती. त्या दुचाकीवरून ते चोरी करण्यासाठी गेले. परंतु, सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी आणलेली दुचाकी तेथेच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.