जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२६ । उद्यापासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. त्यापूर्वी आज सोमवारी बोर्डाकडून तातडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना, नियम आणि खबरदारी जाहीर करण्यात आली.

नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. 3387 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे असणार आहेत. तर 3,80,692 विद्यार्थी हे कला शाखेची परीक्षा देणार आहेत. तर 3,20,152 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायंन्सचेही काही विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

पुढे बोलताना नंदकुमार बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत. बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.

पेपर वाचण्यासाठीच्या वेळेबाबत मोठा निर्णय
विद्यार्थ्यांने त्यांचे हॉलतिकिट शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याआधी 11 वाजता पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. मात्र यंदा 11 वाजता पेपर सुरु झाल्यानंतर 10 मिनिटे पेपर वाचन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे, परीक्षेच्या शेवटी हा वेळ जोडला जाणार आहे. हा यंदाच्या परीक्षेतील मोठा बदल असणार आहे. पेपर लीक होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना तासाला 20 मिनिटे लेखणीक देण्यात येणार आहेत. कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आलेली आहे.










