जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात परीक्षा आणि सुट्ट्यांचे एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

दरम्यान, परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार असून, १ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यापर्यंत होत असतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू होतात. पण विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो. प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांची चिंता :
या निर्णयावर काही शाळा व्यवस्थापनांनी चिंता व्यक्त केली आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, २५ एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर लगेचच १ मेपूर्वी निकाल तयार करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ नसल्याने गुणवत्ता नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.