⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची तत्काळ कोरोना चाचणी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची तत्काळ कोरोना चाचणी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना (COVID19) विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ‘कोविड 19’ विषाणूची कुठलीही लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे संदर्भित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘निमा’, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्राद्वारे केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, की  जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 68 हजार 367 व्यक्तींची ‘कोविड 19’ तपासणी करण्यात आलेली असून एकूण ‘कोविड 19’ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 78 हजार 470 एवढी आहे. सद्य:स्थितीत 9 हजार 873 रुग्ण उपचार घेत असून एकूण कोविड 19 रुग्णांपैकी 1 हजार 501 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जानेवारी 2021 पर्यंत ‘कोविड19’ रुग्ण संख्या ही उतरत्या क्रमाने होती. तथापि, गेल्या काही दिवसांत  ‘कोविड 19’ रुग्ण संख्येच्या प्रमाणात तीव्र स्वरुपात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘कोविड1’ लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचे तातडीने निदान, तपासणी व उपचार न झाल्यास रुग्ण अत्यवस्थ होण्याचे व त्यायोगे त्यांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होवू शकते.

‘कोविड 19’ सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या आजाराचे निदान हे RT-PCR/Antigen चाचणी द्वारे तातडीने होवून झालेल्या निदानाचे अनुषंगाने योग्य उपचार आवश्यक आहेत. ‘कोविड 19’ या साथ रोगात विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अत्याधिक आहे. वेळीच निदान होवून उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता, तर वाढतेच सोबतच संसर्गाचा प्रसार कमी झाल्यास रुग्णाच्या संपर्कातील कमीत कमी व्यक्तींना संसर्ग होतो.

रुग्णालयात दाखल ‘कोविड 19’ रुग्णांच्या भेटीमधून आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेअंती, असे निदर्शनास आले आहे, की ‘कोविड19’ सदृश्य लक्षणे दर्शविणाऱ्या रुग्णांना ‘कोविड 19’ची चाचणी करण्याबाबत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुचविणे आवश्यक आहे.  त्याऐवजी ‘कोविड 19’ चाचणीचा आग्रह न करताच Symptomatic Treatment  काही डॉक्टरांकडून दिली जात आहे.

रुग्णांच्या लक्षणानुसार टायफॉईड असल्याचे रुग्णास सांगून Monocef IV दिले जाते. ‘कोविड 19’ बाबत करावयाची उपचारपध्दती वेळीच न केल्याने पुढील 3-4 दिवसांत रुग्णांस बरे न वाटता तो अधिक अत्यवस्थ होतो. अत्यवस्थ झालेला, गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना साहजिकच श्वसनाचा त्रास जाणवून त्यांना ऑक्सिजन लावण्याची, व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयाकडे संदर्भित केले जाते.

वास्तविकत: वेळीच निदान झाल्यास रुग्ण अत्यवस्थ न होता, गंभीर अवस्थेत न जाताही त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा ‘कोविड19’ बरा करता येऊ शकतो. परंतु उपचार व निदान होण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले पहिले 3-4 दिवस विनाकारण वाया घालवले जात आहेत.

कोविड रुग्णालयात उपचार घेतलेले व दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे अंकेक्षण (Death Audit) केले जाते. त्यात या अशा सर्व गंभीर स्वरुपाच्या चुका दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व डॉक्टरांना आपल्या स्तरावरुन परिस्थितीच्या गंभीरतेची जाणीव करुन पुढील प्रमाणे तातडीने सूचना निर्गमित कराव्यात. त्या अशा :  ‘कोविड 19’ चे कुठलेही लक्षण असलेल्या व्यक्तींना तातडीने RT-PCR/Antigen चाचणी करणेसाठी संदर्भित करावे. ‘कोविड 19’ ची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नावे कळविण्याबाबत स्थानिक आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्याशी संपर्क साधून ‘कोविड 19’ सदृश्य रुग्णांची माहिती द्यावी. संबंधित डॉक्टरांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. टायफॉईड अथवा Symptomatic Treatement करुन रुग्णांची आरोग्याची स्थिती खालावण्यास हातभार लावू नये. अंकेक्षणात (Death Audit मध्ये) उपरोक्त प्रमाणे डॉक्टरांच्या गंभीर दोषामुळे, हलगर्जीपणा मुळे वा चुकीच्या रोग निदान/ उपचार पध्दतीमुळे रुग्ण दगावल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक अधिनियम, नर्सिंग होम ॲक्ट, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अन्वये दोषींविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.