कोविडमुळे अनाथ झालेल्यांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेतंर्गतचे लाभ तातडीने द्या : जिल्हाधिकारी
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना तसेच एकल/विधवा महिलांना शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले.
कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बॅकेचे जिल्हा समन्वयक अरुण प्रकाश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे उल्हास पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. वैजयंती तळेले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. ठाकूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना जाहिर केली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना आवश्यक ते लाभ देण्याची कार्यवाही सर्व संबंधित विभागांनी तातडीने करावी. त्याचबरोबर अनाथ बालके व विधवा महिलांना कुटूंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचा लाभ, बँक खाते उघडणे, आधारकार्ड, जन्म,मृत्यु दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ताविषयक हक्क मिळवून देण्यासाठी मदत करणे, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ, घरकुल आदि योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती मदत सर्व संबंधित विभागांनी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांना दिलेत.
अनाथ बालके व विधवा महिलाना मदतीसाठी जिल्ह्यातील दानशूर, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील भरारी फाऊंडेशनने 13 अनाथ मुलांना प्रत्येकी 5 हजार रुपये, शैक्षणिक किट व एका महिलेस किराणा दिला. गार्डियन फाऊंडेशनने एका मुलास 12 हजार 500 रुपये तर एका मुलीस 11 हजार रुपये शैक्षणिक फी दिली. लोकसमन्वय प्रतिष्ठानने 2 मुलांना फी माफी करून देणेसाठी मदत केली. मौलाना आजाद फाऊंडेशनने 3 विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. तर साने गुरूजी फाऊंडेशनने 1 अनाथ बालकास शैक्षणिक किट व 1 विधवा महिलेस 2 हजार रुपये व रक्षाबंधनानिमित्त साडी भेट दिल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी बैठकीत दिली.
तसेच सध्या जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 20 असून या बालकांना सांभाळण्यास नातेवाईकांना बाल कल्याण समितीने परवानगी दिली आहे. तर एक पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांची संख्या 600 तर 18 वर्षावरील बालकांची संख्या 60 इतकी आहेत. बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या 302 आहेत. तर कोरोनामुळे विधवा झालेल्या 285 महिलांची माहिती प्राप्त झाली असून त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यादी तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या 20 बालकांचे नावे 5 लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. या बालकांना पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी प्रस्ताव पुरवठा अधिकारी यांचेकडे देण्यात आला आहे. या बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी विभागीय कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला असून या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन स्किम अतंर्गत लाभ मिळण्यसाठी आवश्यक कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. परदेशी यांनी सांगितले.