⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

थंडीच्या मोसमात मुसळधार पावसाचा इशारा ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । मागील काही दिवसापासून हवामानात मोठा बदल होत असून काही शहरांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही ठिकाणी थंडीची चाहूल सुद्धा जाणवत आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. मात्र, यातच काही राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशभरातून मान्सून परतला असला तरी अद्यापही काही राज्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.पुढील ७ दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे.

स्कायमेट हवामान अहवालानुसार, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्तीसगड आणि ओडिशामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयात 3 नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी लागलर आहे.

या सोबतच केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होणार आहे.