जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । एकीकडे राज्यात तापमानाचा पारा वाढून उष्णतेत मोठी वाढ झाली असून त्यातच वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट येणार असून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट?
वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी यासोबतच पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नुसता मुसळधार पाऊस कोसळणार नाही तर ५० ते ६० किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जळगावात हवामानाची स्थिती काय?
गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काहीसा पाऊस झाला असला तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता दिसून येत आहे. या दरम्यान हवेची कमाल गतीही ताशी १८ ते २२ किलोमीटर राहील. २२ ते २६ मार्च दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान १८ ते २० अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी आकाश निरभ्र असेल तर किंचित वेळेस हलकेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे