⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

यंदाचा उन्हाळा अधिकच तापणार ; IMD कडून एप्रिल-जूनदरम्यानचा उन्हाळ्याचा अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याने प्रचंड उष्णता जाणवली. यामुळे नागरिक हैराण झाले. मार्चमध्येच तापमानात वाढ झाल्याने पुढील उन्हाळ्याचे दिवस कसे जाणार? असा प्रश्न पडला आहे. मात्र यातच यातच यंदाही कडक उन्हाची भीती भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या उन्हाळ्याच्या अंदाजाचा अहवाल प्रसिद्ध केला.

त्यानुसार महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये अधिक तापमान असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तापमान जास्त राहणार आहे. तसेच यावर्षी तीन महिन्यांतील 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.या तीन महिन्यांत उष्णतेच्या लाटांची संख्या 4 ते 8 दरम्यान राहते. परंतु यंदाचा उन्हाळा चांगलाच उष्ण ठरणार आहे.

एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील तीन महिन्यांत देशातील सहा राज्यांमध्ये तापमान अधिक राहणार आहेत. त्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात तापमान 2 ते 5 अंशांनी वाढू शकते. एप्रिल-जून दरम्यान भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मैदानी भागांमध्ये उष्णतेची लाट सामान्यपेक्षा जास्त असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.

असे असू शकते कमाल तापमान
मार्च :३६ ते ४० अंश सेल्सिअस
एप्रिल :३८ ते ४२ अंश सेल्सिअस
मे :४२ ते ४४ अंश सेल्सिअस

नागरिकांनी काळजी घ्यावी
देशात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.