राज्यात पुन्हा एकदा मुसळधारचा इशारा : जळगाव जिल्ह्यालाही हवामान खात्याचा महत्वाचा अलर्ट जारी
जळगाव लाईव्ह न्यूज : 17 सप्टेंबर 2023 : राज्यात एकीकडे गणरायाच्या आगमानाची जोरदार तयारी सुरु असताना अनेक जिल्ह्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. शनिवारी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत पाऊस झाल्यानंतर आजही काही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज १७ सप्टेंबरसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात काही दिवसाच्या ब्रेकनंतर पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले. मागील दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. काल शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र पावसाची चौफेर फटकेबाजी सुरू झाली. मध्यरात्री जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुक्ताईनगर ते रावेर जाणारा मुख्य रस्त्यावर निंभोरा सिमजवळ नदीचे पाणी शिरल्याने रस्ता बंद झाला. सध्या हतनूर धरणाचे पूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आला असून यातून लाखो क्यूसेसचा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या यामुळे प्रशासनाने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज कुठे कोणता दिला अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा, सोलापूर, नगर, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.