⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

राज्यात बाप्पाचं आगमन पावसाने होणार ; जळगावात कशी राहणार स्थिती? वाचा IMD चा अंदाज..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । यंदाचा पावसाळा संपायला अवघे काही दिवस उरले आहे. पावसाने सुरुवातीला निराशाजनक हजेरी लावली. मात्र त्यानंतर चांगला पाऊस झाल्यांनतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र राज्यातील काही भागात मागील काही दिवसापासून पावसाने कमबॅक केल्याने दिलासा मिळाला. यंदा गणपती बाप्पाचं आगमन पावसाने होणार आहे.

आजपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज राज्यातील ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.दुसरीकडे, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, जळगावात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने सोमवारी उसंती घेतली. काल सकाळपासून कडक ऊन होते. दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण झाले होते. दरम्यान, आज मंगळवारी गणरायाचे आगमनदेखील पावसातच होणार आहे. आज हलका ते तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. अशातच हवामान खात्याने मंगळवारपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.