⁠ 
रविवार, मे 19, 2024

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी ; आज तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १७ ऑक्टोबर २०२२ । ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सोमवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. पहाटपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरीही तो राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागातून निघाला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद होत आहे. गेल्या बारा दिवसांत राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी म्हणजे 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.