राज्यातील १९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; जळगाव जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । राज्यातील अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पण अद्यापही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये. मात्र काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाबाबत जळगाव जिल्ह्याला आज कुठलाही अलर्ट देण्यात आला नाहीय.
आज शनिवारी राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याच्या माहितीनुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं पुराचं पाणी शेतात शिरलं आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळं खरडून गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे. उत्तर ओडिशा आणि बाजूच्या प्रदेशावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे तसेच हे क्षेत्र उत्तरेकडे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात पावसाबाबत कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीय. मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. परंतु या आठवड्यात पावसाने तुरळत हजेरी लावली. पावसाचे ढग दाटून येत असले तरी पाऊस हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटत आले तरी जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीय. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील जलसाठा अद्यापही वाढला नसल्याने चिंता वाढली आहे. त्यातचा ता चार दिवसानंतर उत्तर मध्य महाराष्ट्रसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची व्यापकता येत्या चार दिवसांमध्ये कमी होईल.