बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात शिक्षण सेवकांची बेकायदा भरती

जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। भुसावळ शहरातील श्री सरस्वती प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात खोट्या ठरावांसह दाखल्यांद्वारे दोन शिक्षण सेवकांची बेकायदा भरती करून शासनाची तब्बल १७ लाख २ हजार ६३० रूपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तक्रार अर्जावरून संस्थाध्यक्षा, प्राचार्य, दोन शिक्षण सेवकांसह सहा जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात महेश चौधरी व रुकसाना बी.ताज्जुमल यांना २०१४ ते २०१७ या काळात संस्थेत शिक्षण सेवक म्हणून कागदोपत्री रूजू करून घेण्यात आले तसेच त्याबाबत खोटा ठराव व खोटे दाखले तयार करण्यात आले.

याबाबत खोटा अहवाल माहिती शिक्षण उपसंचालक, नाशिक कार्यालयात सादर करण्यात आली. दोघा शिक्षण सेवकांच्या पदासह वेतनश्रेणीला मान्यता मिळाल्यानंतर जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या सात महिन्यात शासनाकडील तब्बल १७ लाख २ हजार ६३० रुपयांचा पगारही लाटून शासनाची फसवणूक करून शासन रकमेचा अपहार करण्यात आला.

श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या माजी संस्थाध्यक्ष जयश्री शालिग्राम न्याती रा. शारदा नगर यांनी भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिली. या अर्जाबाबत चौकशी झाल्यानंतर रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात शिक्षण सेवक महेश अरविंद चौधरी, शिक्षण सेवक रुकसाना बी.ताज्जुमल तसेच प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य मंगला आल्हाद साबद्रा, सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, श्री सरस्वती प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्माबाई मोतीलाल कोटेचा, प्रा.डॉ.जर्नादन विश्वनाथ धनवीज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.