⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पाचोऱ्यात शिंदे गटसह भाजपाला दणका ; मातोश्रीवर जाणून शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । पाचोरा-भडगाव मतदार संघातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेवरील श्रद्धा आणि गलिच्छ राजकारणापासून दूर असलेले कावेबाजपणा नसलेले, नीतिमत्ता, एकनिष्ठता, सत्यवादी, प्रामाणिक व पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे एकमेव नेते असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम व संस्कार गुणांनी प्रेरित होऊन पाचोरा-भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी शिवसेना उबाठा पक्षाचा झेंडा हाती घेतला.

मार्गदर्शन करतांना उध्दव ठाकरे म्हणाले की आर.ओ.तात्या हा माणुस खंदा कार्यकर्ते होते. त्यांचं जाणं हे सगळ्यांसाठीच आघात होता. आघाताला न घाबरता वैशाली यांनी त्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्व:ताला झोकुन दिलं त्यामुळे ताईंचं कौतुकच वाटतं. सत्तेला घाबरुन चालणार नाही. सत्तेची भिती वाटत असेल तर तिला उलथवलेच पाहिजे त्यासाठीच मी उभा आहे. या कामात आपण सर्वजन सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करुन हे वर्ष आनंदाचे व लोकशाहीचे जावोत अशा शुभेच्छा उध्दव ठाकरेंनी दिल्यात. तसेच खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, आमच्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही पण उध्दव ठाकरे आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने काम करुन जिंकु या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वैशाली सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या की मागील दीड वर्षापासुन मी सतत फिरत आहे. उध्दव ठाकरेंवर निष्ठा आणि त्यात्यासाहेबांवरील प्रेमापोटी हा गोतावळा जमला. अल्पावधीतच तो यापेक्षाही जास्त होईल असा निर्धार व्यक्त केला. नीतिमत्ता गहाण ठेवून खोट्या निष्ठेची पांघरूने घालत, सत्याला दडपून राजकारणात खोट्या निष्ठेचा नवा बाजार सुरू झाला. मंदिरात देवाची शपथ घेवूनही स्वार्थासाठी निष्ठा कशा विकल्या जातात. आज देशात, महाराष्ट्रात सगळीकडेच अतिशय घाणेरडे राजकारण सुरू आहे. नैतिकता हरपली आहे, केवळ पैशासाठी श्रद्धांचा, निष्ठांचा लिलाव होताना दिसत आहे. सत्याला दडपण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर सऱ्हासपणे सुरू आहे. विकासाच्या नावाखाली केवळ आपल्याच कार्यकर्त्यांचे खिसे भरून त्यांना कामाचे ठेके देवून, त्यांना मोठे करून जनतेच्या पैशाची लूटमार सुरू असल्याचे सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.