नियमित वीजबिल भरल्यास कसा होतो शेतकऱ्यांचा फायदा ? वाचा सविस्तर
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने सूक्ष्म नियोजन केले आहे. कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते लवकरात लवकर बदलून देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही रोहित्र जळू नये वा नादुरुस्त होऊ नये, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. जितक्या अश्वशक्तीसाठी वीजजोडणी मंजूर झालेली आहे, तितक्याच अश्वशक्तीचा कृषिपंप शेतकऱ्यांनी वापरावा. तसेच आकडे टाकून अथवा अनधिकृतरीत्या वीज वापरू नये आणि इतरांनाही तसे करू देऊ नये, जेणेकरून आपले रोहित्र सुस्थितीत राहील व अतिभारामुळे ते जळणार नाही.
महावितरण कंपनी वीज निर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरीत करीत असते. शेतीसाठी अत्यंत सवलतीचा वीजदर आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहकांनी थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या
दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महा कृषी ऊर्जा अभियान राबवले जात असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महावितरणने केले आहे.