जळगाव लाईव्ह न्यूज | ३० मार्च २०२३ | जळगावमधील उन्हाळा हा अंगाची लाहीलाही करणाराच असतो. साधारणत: मार्च महिन्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. व एप्रिल आणि मे मध्ये सुर्य अक्षरक्ष: आग ओकतो, अशी परिस्थिती राहते.
यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. मात्र मार्च महिन्यात अगदी उलट वातावरण राहिले. अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळे मार्च महिन्यात उन्हाळा जाणवलाच नाही. किंबहुना रात्री व पहाटे थंडीचा अनुभव आला.
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची उंची गाठणार्या जिल्ह्यांमध्ये जळगावचे नाव नेहमीच अग्रभागी राहते. यंदा फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमानाने नवी उंची गाठल्याने फेब्रुवारी महिना सर्वाधिक हॉट राहीला. यामुळे मार्च महिन्यात काय होईल? अशी भीती होती मात्र वातावरण अगदी उलट राहिले.
मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खालीच होता. अगदी जसे जानेवारी महिन्यात वातावरण राहते, अशीच परिस्थिती मार्च महिन्यात होती. साधारणत: ३० अंशापर्यंतच तापमानाचा पारा राहिल्याने, जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.
एप्रिल महिन्यात हळूहळू तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होईल, मात्र महिन्याच्या मध्यात दोन ते तीन दिवस पुन्हा ढगाळ वातावरणाचा अनुभव येवू शकतो, असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीही भर एप्रिल महिन्यात गारपीटीचा अनुभव आला आहे. यंदाही तशीच परिस्थिती राहू शकते. मात्र एप्रिल व मे महिन्यात सर्वोच्च तापमानाची नोंद देखील होईल, असाही जाणकारांचा अंदाज आहे.