⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोण-कुठचा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि सरकारला कामाला लावून गेला!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । अगोदरच तीन चाकांवर असलेल्या राज्य सरकारवर परीक्षा, भरती, शैक्षणिक घोटाळ्यामुळे प्रचंड टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेत वारंवार नवनवीन आदेश जारी करणाऱ्या सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच होम पीचवर घाम फोडला तो विद्यार्थ्यांनी. मुळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा चेहरा म्हणजे ‘हिंदुस्थानी भाऊ’ हा एक युट्युबर चेहरा असल्याचे समोर आले. सोशल मिडियातून आवाहन करीत त्याने सरकारलाच आव्हान दिल्याने वातावरण चांगलेच पेटले आहे. आजच्या आंदोलनाने सरकारविरोधी नाराजी आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयश उघडे पडले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेकांनी सरकार म्हणजे तीन चाकी गाडी असून ते टिकेल की नाही? अशी शंका उपस्थित केली होती. कोरोना काळात विकासात्मक बाबी आणि इतर विषयांवर फारसे काम करण्यास संधी न मिळाल्याने सरकारची डुगडुगी हळूहळू पण यशस्वी वाटचाल करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वाटचालीत भाजप टीकेची एक संधी सोडत नाही. स्थापनेपासूनच सरकार टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. विशेषतः विविध विभागांच्या परीक्षा आयोजित करताना उडालेला गोंधळ, वारंवार बदललेल्या तारखा, हॉल तिकीटचा घोळ, शाळा-महाविद्यालय सुरू आणि बंद करण्याचे बदलणारे निर्णय, ऑनलाईन-ऑफलाईन परीक्षेचा प्रश्न, शिक्षण आणि गृह विभागाशी संबंधित घोटाळे, आरोप सुरूच आहेत.

‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. घोटाळे आणि आरोपांच्या गर्तेतून बाहेर पडत नसलेल्या सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच होम पीचवर अजून मुछ देखील न फुटलेल्या विद्यार्थ्यांनी घाम फोडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर अर्ध्या तासात विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमला. विद्यार्थ्यांमध्येच उपस्थित असलेल्या ‘विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ’ला पोलिसांनीच बाहेर काढले. सुरुवातीला शेकडोने असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत सरकारला आवाहन वजा आव्हान देणारा एक व्हिडिओ ‘हिंदुस्थानी भाऊ’ने सोशल मिडियात पाठवला आणि मग रान पेटले. विद्यार्थी संख्या वाढत गेली, शिक्षण मंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यात आला. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केल्यावर विद्यार्थी जुमानत नसल्याने सौम्य लाठीचार करावा लागला. सरकार पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी आले.

सोशल मिडियात स्टार असलेल्या हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनावर खरंच इतके विद्यार्थी जमणे शक्य आहे का? विद्यार्थ्यांची गर्दी जमत असताना पोलीस झोपा काढत होते का? हिंदुस्थानी भाऊला तिथून बाहेर काढण्यापेक्षा त्याला तेव्हाच अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न आज उभे राहतात. विद्यार्थ्यांच्या मनात सरकारच्या धोरणाविरोधात उठून आलेला संघर्ष आज रस्त्यावर दिसून आला, हिंदुस्थानी भाऊ हे मात्र निमित्त ठरले. अचानक आलेल्या या हिंदुस्थानी भाऊच्या एका हाकेला राज्यभरात पडसाद उमटले. शिक्षणाची कास धरत उज्ज्वल भारताच्या यशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आजचे आंदोलन अपेक्षित नव्हते. सरकारला घाम फुटला पण हिरो दुसराच झाला. राजकारणी पुन्हा राजकारण करण्यात मग्न झाले. काही महिन्यांपूर्वी देखील राज्यसेवेची परीक्षा देणारे विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले होते आणि पण तेव्हा त्यांना उचकवणारा कुणी हिंदुस्थानी भाऊ नव्हता किंवा ते कुणाच्या शब्दाला बळी पडतील असे कोवळे चेहरे देखील नव्हते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि भविष्यात जनसेवेच्या कार्यात कर्तव्य बजावण्याचे स्वप्न पाहणारे जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार खरचं चुकले असे वाटते.

आजच्या आंदोलणाला ‘हिंदुस्थानी भाऊ’ हे निमित्त असले तरी सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेणे देखील आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बहुतांश काळ बंद होते. ऑनलाईन शिक्षण अनेकांच्या पथ्यावर पडले नाही. १२ वी भविष्यातील करियरच्या वाटा निश्चित करणारा महत्वाचा टप्पा आहे. गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी सरकारकडे दाद मागत असून देखील सरकार निर्णय घेत नाही. मंत्र्यांच्या बैठका ऑनलाईन होतात तर मग परीक्षा ऑफलाईन का? हा हिंदुस्थानी भाऊने विचारलेला सवाल देखील रास्तच आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी किंवा परीक्षा पुढे ढकलावी हा मार्ग सरकारसमोर आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंदुस्थानी भाऊला भेटायला वेळ देणार असल्याचे सांगितले असून दुसरीकडे गुन्हा दाखल करण्याची देखील तयारी सुरू आहे. सरकारला घाम फोडणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या मागे येणाऱ्या काळात चौकशींचा ससेमिरा लागला तर त्यात वावगे काही वाटू नये.