⁠ 
रविवार, मे 19, 2024

डांबून ठेवलेले ६ मजूर, ७ बालकांची सुटका, उच्च न्यायालयाने दिले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । कामासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या ६ ऊसतोड मजूर व त्यांच्या ७ अल्पवयीन बालकांची पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी सुरक्षितरित्या सुटका केली. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.


ऍड. जितेंद्र विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात काही ऊसतोड मुकादम बोदवड तालुक्यातील काही ऊसतोड कामगारांना पैशांचे प्रलोभन दाखवून आपल्या सोबत घेऊन गेले होते. अशिक्षित व अत्यंत गरिबीने त्रस्त मजूर थोड्याफार पैश्याच्या आशेने ह्या मुकादमांवर विश्वास ठेऊन आपली घरदार सोडून कर्नाटकातील नंदी साखर कारखान्यानजीक गेले होते. त्यातील एक कुटुंब दौंड तालुक्यात एका वीट भट्टीवर डांबून ठेवण्यात आले होते. मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून अंधाऱ्या खोल्यामंध्ये बंद केले होते काम न करणाऱ्यांना उपाशी ठेवले जात होते. या परिवारात काही अल्पवयीन बालके होती. या पीडितांनी बोदवड तालुक्यातील मूळ गावी आपल्या नातेवाइकांना ही माहिती दिली. त्यांनी बोदवड पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र, कुणी दखल घेतली नाही. त्यानंतर सामाजिक संघटनांनी उपोषण केले. नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतरही हालचाल न झाल्याने नातेवाइकांनी सरळ न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरवले. ऍड. जितेंद्र पाटील यांनी खंडपीठात याचिका दाखल करुन मजुरांची सुटका करावी व मुकादमाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या याचिकेवर २२ राेजी न्या. व्ही. के. जाधव व एस.सी.मोरे यांच्या पीठाने पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना नोटीस काढून ५ जानेवारीपर्यंत आपले म्हणणे सदर करण्यास सांगितले. त्यानंतर मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु झालेे. ३० डिसेंबर रोजी सर्व बंदिस्त परिवारांची सुटका करून त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

नवजात बालिकेचाही होता समावेश

मुकादमाच्या सुटका होऊन आलेल्या मजुरांमध्ये सहा वयस्क महिला व पुरुष मजूर असून सात अल्पवयीन बालके आहेत. त्यात एक चार महिन्याच्या नवजात बालिकेचा देखील समावेश आहे. त्यांना सुटका झाल्याने दिलासा मिळाला.

हे देखील वाचा :