जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे हुडहुडी भरणारी थंडी गायब झाली आहे. दरम्यान आज मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.

ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे केळी पिकांसह रब्बी हंगामातील गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असून यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत

बदलत्या हवामानामुळे जळगावमधील थंडी गायब झाली आहे. ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ उतारामुळे हुडहुडी भरवणारा गारठा ओसरल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी एक ते दोन दिवस अशीच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

दरम्यान हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे.






