जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । मागच्या तीन चार दिवसात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात ही पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यात आणखी २ दिवस पावसाचा जोर राहणार आहे. आज गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नगरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाचे असमान वितरण दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत एकूण १७८ मिमी पाऊस होतो. मात्र, यंदा आतापर्यंत १६९ मिमी पाऊस झालेला आहे. आतापर्यंतच्या एकूण सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ९५ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात जरी गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी पावसाचा वेग कमी राहिला आहे. काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही.त्यामुळे जिल्ह्यात अजूनही पावसाची तूट दिसून येत आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला.

आज हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना अलर्ट
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज जळगावसह नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर इकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.







