जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२५ । मे महिना म्हटलं की भाजून काढणारे ऊन पडते. मात्र मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. जळगाव जिल्ह्यालाही वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यातच आगामी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच गारपीट व वादळी पावसामुळे ६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ४ मेपासून अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण आठवडाभर ही स्थिती कायम राहणार आहे. १० व ११ मे रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात देखील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मे महिना पावसातच..?
मे महिना हा उन्हाळ्यातील सर्वात उष्णतेचा महिना मानला जातो. मात्र, यंदा हा महिना बऱ्यापैकी पावसातच जाण्याची शक्यता आहे. गुजरात पासून, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील काही भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. यामुळे आगामी काही दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. त्यात हे कमी दाबाचे क्षेत्र अजून वाढत गेले तर, पावसाचा मुक्काम काही दिवस लांबू शकतो. त्यातच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाचीही शक्यता जिल्ह्यात आहे. त्यामुळे हा महिना पावसातच जाण्याची शक्यता आहे.