जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा । गेल्या काही दिवसापासून गायब असलेल्या पावसाचे चार पाच दिवसांपासून मुंबई, रत्नागिरी सह काही भागात धुमसान सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव शहरासह काही तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावली असली तरी पाचोरा शहरासह तालुक्ात मुसळधार पाऊस झाला. पाचोरा शहरात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजे पासून पावसाला सुरुवात झाली साधारणतः 8.30 पर्यंत सर्वत्र धो धो पाऊस कोसळला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान शहराला जोडणाऱ्या भुयारी मार्गात सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच वेळी शिवाजी नगरातील जारगाव चौफुली जवळ असणाऱ्या पुलावरून देखील दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने येथेही रस्ता बंद झाला होता. मुख्य शहर व भडगाव रस्ता परिसराचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला यामुळे शहर पाऊस आणि अंधारात बुडाले होते.