जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । जळगावसह राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचे सावट होते. या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली होती. मात्र आता उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान तापमानात वाढ होणार आहे. या काळात ४३ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमान राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या खालीच राहिला. त्यातही मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात थंडीचाही कडाका कायम होता. त्यामुळे मार्च महिना तसा जळगावकरांसाठी फारसा तापदायक ठरला नाही; मात्र आगामी काही दिवसात जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. तर काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानेही हजेरी लावली; मात्र आता जिल्ह्यावरील अवकाळी पावसाचे संकट कमी झाले असून, जिल्ह्यात आगामी काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन, पारा ४३ ते ४४ अंशावर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे तर उत्तर पश्चिम भारतातही पुढील सहा दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, दक्षिण हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या राज्यांमध्येही उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.