गुरूवार, डिसेंबर 7, 2023

स्वतःच्याच हाताने हॉलमध्ये बसून मेंदूवर केली शस्त्रक्रिया; काय घडले वाचा सविस्तर !

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। विज्ञान आणि तंत्रज्ञान सध्याच्या युगात वेगाने प्रगती करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा विविध वैज्ञानिक शश्त्रक्रियांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करतात.या सगळ्या गोष्टीचे विशिष्ट प्रशिक्षित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर प्रयोग केले जातात. परंतु, एका रशियन वैज्ञानिकाने स्वतःच्याच मेंदूवर शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्याने ही सर्जरी आपल्या घराच्या हॉलमध्ये बसून केली. स्वतःला पडणाऱ्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूमध्ये एक चिप बसवल्याचंही त्याने म्हटलं आहे.

मायकल रादुगा असं या वैज्ञानिकाचं नाव आहे. या वैज्ञानिकाकडे न्यूरोसर्जरीचं लायसन्स, किंवा अनुभवही नाही. तरीही त्याने स्वतःवर अशी गंभीर शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं आहे. या प्रक्रियेत आपलं एक लीटर रक्त वाहून गेल्याचंही मायकलने सांगितलं. मायकलने फेज रिसर्च सेंटर नावाची संस्था उभारली आहे. या संस्थेमध्ये झोप आणि स्वप्नांवर अभ्यास केला जातो. स्लीप पॅरालिसीस, अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन अशा समस्यांवर तो मार्गदर्शन करू शकतो, असा दावा ही संस्था करते. मायकलचे रशियामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत.

हा प्रयोग आपण आपल्या ल्युसिड ड्रीम्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला आहे, असं मायकलने स्पष्ट केलं. ल्युसिड ड्रीम्स म्हणजे अशी स्वप्नं, ज्यात स्वप्न पाहणाऱ्याला याची जाणीव असते की तो स्वप्न पाहतोय. मात्र, स्वप्नात जे काही होत आहे, त्यावर आपलं नियंत्रण नसतं. मायकलने खरोखरच ही सर्जरी केली असेल, तर तो अगदी थोडक्यात बचावला आहे असं न्यूरोसर्जन अ‍ॅलेक्स ग्रीन यांनी म्हटलं आहे.

“हे अत्यंत धोकादायक आहे, या सर्जरीमध्ये कित्येक कारणांनी त्याचा जीव जाऊ शकत होता. उदाहरणार्थ, जर त्याच्या कॉर्टिकल नस किंवा इंट्रासेरेब्रल व्हेसलमधून रक्तस्त्राव झाला असता; तर लगेच स्ट्रोक येऊन त्याचा मृत्यू झाला असता.” असं ग्रीन म्हणाले.

मायकल यांनीदेखील हे मान्य केलं की यामध्ये त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांनी जवळपास हार मानली होती. मात्र, तरीही थोडा वेळ थांबून त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. यानंतर ही सर्जरी यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेनंतर आपण अंघोळ केली आणि सुमारे दहा तास सलग काम केलं ज्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण आली नाही असा दावा मायकलने केला आहे.