हतनूर धरणाचा विसर्ग वाढला.. ; तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 18, 2025 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेशात तसेच विदर्भात आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, धरणात पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे. हतनूरचे ४१ पैकी आज सोमवारी सकाळी ४ दरवाजे पूर्णपणे तर १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

hatnur dam jpg webp

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस होत असल्याने तापीवरील हतनूरच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत होते. पाटबंधारे विभागालाही वेळोवेळी धरणाचे काही दरवाजे उघडून विसर्ग नियंत्रित करावा लागला होता. दरम्यानच्या काळात पाण्याची आवक थोडी कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणातील उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला आहे.

परिणामी आज सोमवारी सकाळी हतनूरचे ४१ पैकी १४ दरवाजे १ मीटरने तर ४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीच्या पात्रात ५२ हजार ४३६ क्यूसेक इतका विसर्ग सुरू असून नदीला पूर आला आहे. दरम्यान, हतनूर धरणाचा विसर्ग वाढल्यानंतर खाली शेळगाव येथे तापी नदीवर उभारलेल्या बॅरेजचेही १० गेट ०.५० मीटरने तर ८ गेट १ मीटरने उघडण्यात आले आहे. वाढता विसर्ग लक्षात घेता तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर पाण्याची पातळी वाढल्यास हतूनर आणि शेळगाव बॅरेजमधील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now