जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । विदर्भ, मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर धरणाचे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच २४ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून १ लाख २५ हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आवक वाढल्यानंतर हतनूर धरणाचे सहा दरवाजे सोमवारी पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे ६४ हजार ७३२ क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

त्यानंतरही पाण्याची आवक वाढताना दिसून आल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि आठ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तापी नदीच्या पात्रात सुमारे एक लाख २० हजार ७४२ क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. पाण्याची आवक वाढल्यानंतर पुढील काही तासांत एक लाख २५ हजार ते दीड लाख क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
तसेच हतनूर धरणातील विसर्ग वाढल्याच्या स्थितीत शेळगाव बॅरेजचेही १८ दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे तापी नदीच्या पात्रात ४१ हजार ६९२ क्यूसेकने विसर्ग होत आहे.









