जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । घर खर्चासह जुगार खेळण्यासाठी पैसे न दिल्याने २३ वर्षीय विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पती व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिना शेख मोहसीन (23, रा.किनगाव, ता.यावल) या विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या हिना शेख मोहसीन यांचा विवाह जळगाव येथील मोहसीन अख्तर सलीम अख्तर याच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात झाली. पती मोहसीन अख्तर सलीम याने जुगार खेळण्यासाठी विवाहितेने माहेरहुन पैसे आणावे यासाठी मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून नणंदेनेदेखील मानसिक त्रास दिला.
या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शुक्रवार, 15 जुलै रोजी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावरून पती मोहसीन अख्तर सलीम अख्तर, नणंद राहत अख्तर सलीम अख्तर (दोन्ही रा.काट्याफाईल, जळगाव) यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नरेंद्र बागुल करीत आहेत.