⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | मनपा अधिकारी-ठेकेदारांच्या निकृष्ट ‘पेव्हींग ब्लॉक’ला ‘हॅमर टेस्टींग गन’चा दणका; वाचा काय आहे मनपा आयुक्तांची रोकठोक भुमिका?

मनपा अधिकारी-ठेकेदारांच्या निकृष्ट ‘पेव्हींग ब्लॉक’ला ‘हॅमर टेस्टींग गन’चा दणका; वाचा काय आहे मनपा आयुक्तांची रोकठोक भुमिका?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । जळगाव शहरातील पेव्हींग ब्लॉक रस्त्यांचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. शहरातील बहुतांश ठेकेदार काँक्रीटच्या रस्त्यांऐवजी पेव्हींग ब्लॉकचा वापर करुन चकचकीत रस्ते तयार करण्यास प्राधान्य देत आहे. शहरातील बहुसंख्य भागात रस्त्यांवर तसेच ओपन स्पेसमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामांना यापुर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी काम देखील पूर्ण झाले आहे. या कामांचे फोटो काढून चमकोगिरी करण्याचे सर्व सोपास्कार पार पाडले जात आहे. मात्र आता आयुक्त विद्या गायकवाड यांनी हॅमर टेस्टींग गनच्या माध्यमातून या कामांची गुणवत्ता तपासणी केल्यानंतर निकृष्ठ पेव्हींग ब्लॉकचा वापर करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यांपासून अनेक कामांमध्ये होणारा कथित भ्रष्टाचार नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे जळगाव शहर व महापालिकेचे नाव राज्यभर बदनाम झाले आहे. याच पंगतीत मोडणारा नवा प्रकार पेव्हींग ब्लॉकच्या माध्यमातून नुकताच समोर आला आहे. शहातील रस्त्यांची कामे करतांना सिमेंट काँक्रीट ऐवजी पेव्हींग ब्लॉकच्या रस्त्यांना प्राधान्य देण्याकडे काही ठेकेदारांचा कल असतो. याचे मुख्य कारण म्हणजे, रस्त्यांच्या कामात सर्वाधिक नफा प्लेवर ब्लॉक मिळवून दितो. यामुळे ठेकेदार नेहेमीच प्लेवर ब्लॉकचा रास्ता करायला उत्सुक असतात. मात्र याच्या गुणवत्तेबाबत नेहमीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असतात. नेमके यावरच आयुक्त विद्या गायकवाड यांनी बोट ठेवले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान मानल्या जाणार्‍या हॅमर टेस्टिंग गनच्या मदतीने त्यांनी काही ठिकाणीच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान भार सोसण्याची क्षमता नसलेले पेव्हींग ब्लॉक वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे भविष्यात रस्त्यांच्या कामात सर्वाधिक नफा मिळवून देणार्‍या पेव्हींग ब्लॉकच्या कामांना यापुढे बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारामुळे ठेकदार-अधिकार्‍यांच्या संगनमताचे बिंग फोडले गेल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.

बिलाच्या रकमेत कपात करण्याचे आदेश
शहरातील गल्ल्यांमधील काही रस्त्यांसह शहरातील ओपन स्पेसमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामांना यापुर्वीच मंजुरी मिळाली आहे. कामे पूर्ण झाल्याने बिल अदा करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेची तपासणीची मोहिम आयुक्त विद्या गायकवाड यांनी हाती घेतली आहे. त्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वर्दळीचा विचार न करता तसेच अंदाजपत्रकाशिवाय पेव्हींग ब्लॉकचा वापर न केल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यात वाहनांचा भार सांभाळण्याची क्षमता नसलेल्या पेव्हींग ब्लॉकच्या रस्त्यांची परिस्थिती खराब होऊ शकते. आयुक्तांनी केलेल्या सात कामांच्या पाहणीत जान्हवी हॉटेलच्या मागील भागातील गणपती मंदिराच्या परिसरातील तसेच पिंप्राळा परिसरातील अष्टभुजा मंदिराजवळील रस्त्यांच्या बिलाच्या रकमेत कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी काळात रस्त्यांसाठी पेव्हींग ब्लॉकऐवजी काँक्रीटच्या रस्त्यांसाठी अंदाजपत्रक सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.