उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा; शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्रातील जनता कुठे गुलाबी थंडीचा आनंद घेत होती तोवर तापमानात मोठे बदल झालेत. राज्यात आज गुरुवारपासून (२६ डिसेंबर) तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रात तर हवामान खात्याने गारपिटीचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम दक्षिण किनारपट्टीवर दिसून येत आहे. आता महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आजपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागाला पावसाचा इशारा
नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहेत. शुक्रवार (२७ डिसेंबर) व शनिवारी (२८ डिसेंबर) नाशिकसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे.
विदर्भातील काही भागात गुरुवारी हवामान कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्रात धुके राहण्याचा अंदाज आहे. २७ डिसेंबर रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, दक्षिण मराठवाडा, पुणे, नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडचा समावेश. काही प्रमाणात गारपिटीची शक्यता.
२८ डिसेंबर: यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पाऊस व काही भागांत गारपीट, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा अंदाज.
दरम्यान राज्यातील तापमानामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. ढगाळ वातावरण, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.