जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरमार्गे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा तस्करी केली जात असून यावर अनेक कारवाया झाल्या. तरी गुटखा तस्करी सुरूच आहे. अशाच ब-हाणपूर – मुक्ताईनगर रस्त्यावरील खामखेडा गावाजवळ मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत १० लाख १९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी फिर्याद दिली. त्यात संशयित अरबाज नौशाद बेग (वय ३०, रा. काजी हाऊस, खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर) हा ४ जानेवारीला सकाळी ११ वाजेच्या सुमारास खामखेडा गावाजवळ पूर्णा नदीच्या पुलावर एमएच.४६-कोड.१०६५ क्रमांकाच्या कारमधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करीत होता.

ही माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. त्यात ६ लाखांच्या कारसह सुगंधित पान मसाला, तंबाखू, गुटखा असा एकूण १० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तपास पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी करत आहेत.





