जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२५ । पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा याच पदावर नियुक्ती झाल्यानंतर काल, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वणी येथील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईत आपल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात औपचारिक पदभार स्वीकारला.
यावेळी विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अभियान संचालक ई. रविंद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारताना बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानतो. माझा मुख्य भर राज्यातील जनतेच्या पाणीपुरवठा समस्या सोडवणे आणि ग्रामीण भागात स्वच्छतेचे कार्य अधिक गतीने राबविण्यावर असेल.”
मंत्री गुलाबराव पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुस्थितीत करण्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी, स्वच्छ भारत मोहिमेला गती, तसेच लोकसहभाग वाढवून स्थानिक स्वराज्य संस्थांशी अधिक सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.