“दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे” ; गुलाबराव पाटलांनी नेमका कुणावर साधला निशाणा
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर शायरीतून जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले ना. पाटील?
एकनाथ शिंदे 22 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही लोक होते. त्यांनी आम्हाला “दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे” असं म्हणून डिवचलं, असं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल, अशी खूणगाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार होऊ, मंत्री होऊ हे आम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तरी देखील विरोधक आमची बदनामी करत आहेत. “बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है. हम तो वो है जिसे बदनामी डरती है” अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना गुलाबराव पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली असेल. मात्र कोणत्याही गोष्टीला कोणतेही अर्थ लावणे योग्य होणार नाही, असं सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.