जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, या मागणीवरून जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी टोला हाणला आहे. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.गुलाबराव पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य, मात्र मागणी करणं सोपं तसेच सर्व निर्णय पंचनाम्यानंतर जिथे परिस्थिती असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर होणारच आणि राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
दरम्यन, जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने या अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीसाठी केंद्राने मदत देण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा संकटाच्याकाळात केंद्र सरकारने राज्याला पैसे द्यायला हवे. मात्र, केंद्र काही मदत देत नाही, असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात झालेल्या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे असं राज ठाकरे म्हणाले. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.