गुवाहाटीला जाताना माझा तर ३३ वा नंबर ; शिंदेसोबत जाण्याचं कारण गुलाबराव पाटलांनी सांगितलं..
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यात सत्तांतर होण्याच्या आगोदर माझ्या मनात नेमकं काय चाललं होत? हा निर्णय घेण्यामागचं कारण त्यांनी त्यांनी उलगडून दाखवलं. सत्ता समीकरण बदलण्यासाठी राज्यातील अनेक भागातील आमदार शिंदे सोबत गेले. जळगावचे चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले, मात्र तोपर्यंत मी निर्णय घेतलेला नव्हता. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं? गुवाहाटीला जाताना माझा तर ३३ नंबर होता. माझ्या आधी ३२ जण गेले होते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील साळवे गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. सर्वच शिंदेंसोबत पळून गेले होते. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जाहीरी टीका होत गेल्या.
मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा झाला नसता. मात्र मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो आहे. १९८७मध्ये मी शिवसैनिक झालो. बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेनेसाठी काम केले. आणि आता हे माझ्यावर टीका करत आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही. १५ ते २० वेळा मी जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य मी संघर्षात घातलं. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही. मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती.एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी मी सट्टा खेळलो. भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भाजपसोबत गेलो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षासोबत गेलेलो नाही. अजूनही शिवसेने सोबतच आहोत. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेलो नाही, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.